रेबीजपासून बचावाची पहिली पायरी – योग्य माहिती आणि वेळेवर कृती!
रेबीज: एक प्राणघातक आजार
रेबीज हा एक प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे जो मुख्यतः कुत्रा, मांजर, माकड व इतर स्तनधारी प्राण्यांच्या चाव्यामुळे होतो. एकदा लक्षणे दिसू लागल्यास रेबीज मुळे मृत्यूच होतो. मात्र, याचे प्रतिबंध आणि वेळेवर उपचार शक्य आहेत.
भारतीय ग्रामीण‑शहरी परिसरात कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या दुर्दैवी अपघातांच्या घटना सतत घडत असतात. नुकत्याच दोन अत्यंत दुःखद घटना घडल्या आहेत ह्या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकी यांचे दुःखद निधन
उत्तर प्रदेशचे २२ वर्षीय राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकी — ते एका पिल्लाला वाचवत असताना चुकीने कुत्र्याने त्यांची चावा घेतला. एखादी किरकोळ दुर्घटना समजून ब्रिजेशने त्याकडे दुर्लक्ष केलं, डॉक्टरचे मार्गदर्शन घेतले नाही, अँटी‑रेबीज लस घेतली नाही, आणि जिवंत असताना त्यांनी ‘पाण्याची भीती’ (hydrophobia) यांसारखी रॅबीजची लक्षणे दर्शविली. पुढे उपचार दरम्यान २८ जून २०२५ रोजी त्यांचे निधन झाले.
संपूर्ण माहितीसाठी लिंक वर क्लिक करा
शिशू मृत्यू
हा एकमेव दु:खद प्रसंग नाही तर नुकतेच एका १३ वर्षीय मुलाचे मेदक जिल्ह्यातील राष्ट्र (Telangana) येथे कुत्र्याच्या चाव्याने १८ जुलै २०२५ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा
🕊️ मनःपूर्वक श्रद्धांजली
बृजेश सोलंकी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांची हरपलेली ऊर्जा, क्रीडाविषयक निष्ठा आणि स्वप्नं यांची भरपाई शक्य नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मेदकमधील त्या निरागस बालकाच्या कुटुंबालाही मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. त्या मुलाचे अपूर्ण राहिलेले आयुष्य आणि स्वप्ने या समाजासाठी एक मोठी जागरूकता बनून राहतील.
ईश्वर या दोन्ही कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
या दोन्ही घटनांमुळे डॉग बाईट बद्दल जागरूकता निर्माण करणारा प्रश्न आपल्याला समोर येतो –
ब्लॉगच्या पुढील भागात आपण जाणून घेऊया:
- रेबीज म्हणजे काय?
- रबिज चा संसर्ग कसा होतो?
- डॉग बाईट चे वर्गीकरण व त्यानुसार उपचार पद्धती
- लसीकरण
- स्थानिक प्रशासन व नागरिकांनी कसे जबाबदारीने या समस्येचे निराकरण करावे?
रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा Lyssavirus कुटुंबातील व्हायरस मुळे होतो. तो प्रामुख्याने संक्रमित प्राण्याच्या लाळेद्वारे पसरणारा, मज्जासंस्थेवर परिणाम करणारा विषाणू आहे. विषाणू शरीरात शिरल्यानंतर मेंदूपर्यंत पोहोचतो व गंभीर लक्षणे निर्माण करतो व अंततः मृत्यू होतो.
रेबीजचा संसर्ग कसा होतो?
- कुत्रा, मांजर, कोल्हा, वटवाघुळ, मुंगूस यांच्या चाव्यामुळे
- लाळ जखम, डोळे, नाक, तोंडाच्या संपर्कात आल्यास
- स्क्रॅच किंवा चाव्याच्या जखमेतून
रेबीजची लक्षणे
- सुरुवातीला: ताप, अशक्तपणा, गोंधळ
- नंतर: पाण्याची भीती (Hydrophobia), गोंधळ, पक्षाघात
- शेवटी: कोमा आणि मृत्यू
लक्षणे सुरू झाल्यावर रेबीज बरा होण्याची शक्यता जवळपास शून्य.
WHO नुसार कुत्रा चाव्याचे वर्गीकरण (Classification of Dog Bite – WHO)
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कुत्र्यांच्या चाव्याचे वर्गीकरण तीन प्रकारात केले आहे.
🟢 Category I (प्रथम श्रेणी) – कमी धोका
- स्पर्श / संपर्क: कुत्रा चाटतो किंवा संपर्कात येतो पण त्वचेवर कोणताही जखम, खरचटणे किंवा चावा घेतलेला दिसत नाही.
- उपचार: कोणतीही लस किंवा HRIG आवश्यक नाही. फक्त साबण व पाण्याने धुणे पुरेसे असते.
🟡 Category II (द्वितीय श्रेणी) – मध्यम धोका
- लक्षणे: नखांद्वारे किंवा दातांद्वारे त्वचेवर न दुखवणारी जखम, थोडीफार खरचटणे.चावणे पण रक्त निघालेले नाही.
- उपचार:जखम स्वच्छ पाण्याने धुणे व रॅबीज लसीचा कोर्स सुरू करणे गरजेचे आहे. HRIG गरजेचे नाही.
🔴 Category III (तृतीय श्रेणी) – उच्च धोका
- लक्षणे: चावल्यानंतर रक्तस्त्राव होणे, गंभीर जखम, संवेदनशील भागावर चावा (जसे की डोळा, तोंड, जननेंद्रिय).जखमेवर चाटणे.
- उपचार:
- जखम साबण व स्वच्छ पाण्याने स्वच्छ करावीतातडीने रॅबीज लसीचा कोर्स सुरू करावा.
- HRIG (Human Rabies Immunoglobulin) पहिल्या दिवशी द्यावे. हे जखम भोवती दिले जाते.
लक्षात ठेवा:
- कुत्रा पाळीव असो वा भटक्या, चाव्याची श्रेणी उपचार ठरवते.
- रॅबीज एकदा लागला तर प्राणघातक ठरतो. लसीकरण हा एकमेव उपाय आहे.
व्यवस्थापन (Management)
1. जखमांची त्वरित काळजी (Wound Management)
- जखम साबण व पाण्याने 15 मिनिटे धुणे
- Povidone iodine वापरणे
- जखमेवर पट्टी बांधू नये,जखमेवर चुना,हळद लावू नये (aeration आवश्यक असते)
लसीकरण (Post-Exposure Prophylaxis – PEP)
दिवस | लस डोस |
---|---|
Day 0 | 1st Dose + HRIG (Category III साठी) |
Day 3 | 2nd Dose |
Day 7 | 3rd Dose |
Day 14 | 4th Dose |
Day 28 | 5th Dose (केवळ immunocompromised patients साठी) |
- IM (इंट्रामस्क्युलर): थाय (जांघ) किंवा डेल्टॉइड (दंडाच्या वरच्या भागात) देतात.
लसीकरण – Intradermal (ID) Schedule
दिवस | डोस | देण्याची पद्धत |
---|---|---|
Day 0 | 0.1 मि.ली. × 2 साइट्स | दोन्ही डेल्टॉइड (दंडाच्या वरच्या भागात) |
Day 3 | 0.1 मि.ली. × 2 साइट्स | दोन्ही डेल्टॉइड |
Day 7 | 0.1 मि.ली. × 2 साइट्स | दोन्ही डेल्टॉइड |
Day 28 | 0.1 मि.ली. × 2 साइट्स | दोन्ही डेल्टॉइड |
- Intradermal (ID): प्रत्येकी दोन जागी 0.1 मि.ली. डोस देणे आवश्यक आहे.
- ERIG – 40 IU/kg (स्किन टेस्ट आवश्यक)
- HRIG – 20 IU/kg (प्रि-फिल्ड सिरिंज)
- RMAb – 3.33 IU/kg ते 40 IU/kg (नो स्किन टेस्ट)
➡ जखमेभोवती infiltrate करणे आवश्यक असते
4. पूर्व प्रतिबंधात्मक लसीकरण (Pre-Exposure Prophylaxis – PrEP)
धोका असणाऱ्या व्यक्तींसाठी:
पशुवैद्यक, सफाई कर्मचारी, पशुप्रेमी, प्रवासी इ.
Schedule:
- Day 0 – 1st Dose
- Day 7 – 2nd Dose
जर पुन्हा चाव्याचा संपर्क झाला (म्हणजेच PEP पूर्ण झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत पुन्हा चावले गेले), तर फक्त जखमेवर उपचार करणे पुरेसे असते. लस किंवा रॅबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) देण्याची गरज नसते.
जर पुन्हा डॉग बाईट झाल्यास लस घेणे केव्हा गरजेचे असते?
- 3 महिने पेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास
- कुत्रा वर लक्ष ठेवणे शक्य नसल्यास
- कुत्रा पिसाळलेला असल्यास
- जखम जास्त खोल असल्यास
- व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास
- अगोदर घेतले लसीकरण अर्धवट पूर्ण केले असल्यास
- Day 0-1 st dose
- Day 3- 2nd dose
जर पुन्हा डॉग बाईट झाल्यास लस आणि RIG(Rabies Immunoglobulin) घेणे केव्हा गरजेचे असते?
रेबीज ची लागण थांबविण्यासाठी दिला जाणारा पूर्ण संपर्कानंतरचा प्रतिबंधक उपचार (PEP -post exposure prophylaxis) – ज्यामध्ये RIG (Rabies Immunoglobulin) आणि ४ किंवा ५ मात्रा लसी चा समावेश होतो – तो फक्त काही खास परिस्थितींमध्येच दिला जातो.
खालील परिस्थितींमध्ये पूर्ण PEP आवश्यक आहे:
1. इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड (रोगप्रतिकारशक्ती कमी) व्यक्ती:
जर व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल आणि आधी दिलेल्या PEP नंतर प्रतिपिंडांची योग्य प्रतिक्रिया झाली नाही, अशी शंका असल्यास.
2. मागील PEP अपूर्ण किंवा चुकीचा घेतलेला असल्यास:
जर पहिला रेबीज लसीकरण अपूर्ण राहिला असेल, चुकीच्या प्रमाणात दिला गेला असेल किंवा विश्वासार्ह नसलेल्या लसीने दिला गेला असेल.
3. पहिल्या PEP घेऊन 10 वर्षे पेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास:
जर पहिला PEP घेतल्यानंतर १० वर्षांहून अधिक कालावधी झाला असेल आणि दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्तीबाबत शंका असल्यास.
महत्त्वाची टीप:
वरीलपैकी कोणतीही परिस्थिती असल्यास, RIG सोबत पूर्ण लसीकरण (४ किंवा ५ मात्रा) पुन्हा दिले पाहिजे. रेबीजसारख्या गंभीर विषाणूजन्य रोगासाठी उपचार नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.
कुत्रा चाव्याच्या घटनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांची जबाबदारी
भारतामध्ये विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागात कुत्रा चाव्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. यामध्ये केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नसतात, तर समाजाची आणि स्थानिक प्रशासनाचीही महत्त्वाची भूमिका असते. अशा घटनांना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका
- भटक्या कुत्र्यांच्या जनगणनेची व निर्बंधाची मोहीम: स्थानिक नगरपरिषद, पंचायत समिती आणि महापालिकांनी कुत्र्यांची संख्या मोजणे, ओळख पटवणे आणि निर्बंध घालण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
- ABC (Animal Birth Control) प्रोग्रॅम: कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्यावर निर्जंतुकीकरण आणि लसीकरणाचे कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.
- नियमित रॅबीज लसीकरण: भटक्या व पाळीव कुत्र्यांचे दरवर्षी रॅबीज लसीकरण केले गेले पाहिजे. हे मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे.
- प्रसिद्धी व जनजागृती: शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रांमधून लोकांना डॉग बाईट, रॅबीज, व बचाव यासंबंधी माहिती दिली पाहिजे.
- तक्रार निवारण यंत्रणा: कुत्र्यांचे आक्रमण, घातक जमाव इ. बाबतीत नागरिकांची तक्रार घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक व तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा असावी.
नागरिकांची भूमिका व जबाबदारी
- पाळीव प्राण्यांना लसीकरण करणे: आपल्या कुत्र्यांना वेळेवर रॅबीज व अन्य लसी देणे ही प्रत्येक पाळीव प्राणी मालकाची जबाबदारी आहे.
- भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना दक्षता: भटक्या कुत्र्यांना अन्न देताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- तक्रार नोंदवणे: जर एखादा कुत्रा आक्रमक असेल किंवा परिसरात घातक जमाव तयार होत असेल तर लगेच नगरपालिका / पंचायत कार्यालयात किंवा हेल्पलाईनवर माहिती द्यावी.
- जखम झाल्यास त्वरित उपचार: कुत्रा चावल्यास लगेच साबण व पाण्याने जखम धुवून सरकारी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी जावे.
- बच्चे, वृद्ध व गरोदर महिलांची काळजी: या गटांमध्ये रॅबीजचा धोका अधिक असल्याने त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
समुदायाने एकत्रितपणे पुढाकार घेणे
रेबीज ही १००% टाळता येण्यासारखी पण एकदा लागल्यास १००% मृत्यूदर असणारी आजार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि नागरिक यांनी हातात हात घालून काम केल्यास या दुर्दैवी घटनांना रोखणे शक्य आहे.
निष्कर्ष
डॉग बाईट हा फक्त वैद्यकीय विषय नाही, तर तो सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकाने जबाबदारीने व सजगतेने याकडे पाहणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- रेबीज हा १००% मृत्यूदर असलेला झूनोटिक (प्राण्यांकडून मानवात पसरणारा) आजार आहे.
- जखम त्वरित साबण व स्वच्छ पाण्याने किमान 10–15 मिनिटे धुणे अत्यावश्यक आहे.
- Category III चाव्यांमध्ये RIG (Rabies Immunoglobulin) किंवा RMAb (Rabies Monoclonal Antibody) फक्त जखमेच्या आजूबाजूला स्थानिकरित्या टोचावे.
- RIG/RMAb हे कधीही स्नायूमध्ये (intramuscularly) टोचू नये.
- लसीकरणाचा संपूर्ण कोर्स ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
- PrEP (पूर्व-संपर्क प्रतिबंधक उपचार) सर्व मुलांना देणे गरजेचे आहे.
डॉ. अमरचंद हरिदास मेश्राम
M.B.B.S.,Genaral Physician ,M.D. Pediatrics
सल्लागार – जनजागृती आणि आरोग्य ब्लॉग लेखक
सिल्व्हरलाईन क्लिनिक, अमरावती